ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळातील पहिला राजीनामा आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार करून पंधरा दिवसही झालेले नसताना मंत्र्यांच्या राजीनाम्याचा सिलसिला पुन्हा सुरु झाला आहे. मंत्री गेविन विल्यमसन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
गेविन विल्यमसन यांच्यावर आपल्या सहकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. सुनक यांनी मंगळवारी विल्यमसन यांचा राजीनामा मंजूर केला. यावेळी त्यांनी विल्यमसन यांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला हे मी समजू शकतो, असे म्हटले आहे. तुमच्या वैयक्तिक समर्थनाबद्दल आणि निष्ठेबद्दल आभारी आहे. मी तुमच्या या निर्णयाचे समर्थन करतो, असे सुनक यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. गेल्या दोन पंतप्रधानांच्या काळातही मंत्र्यांच्या राजीनाम्यांनी ब्रिटन सरकार हादरले होते.
गेविन विल्यमसन यांची मंत्रिपदाची कारकीर्द यापूर्वीही वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी देखील विल्यमसन हे संरक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री असताना त्यांना मंत्रिमंडळातून काढले होते. थेरेसा मे यांच्या काळात संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप होता. विल्यमसन तेव्हा संरक्षण सचिव होते.
ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन केवळ दोन आठवडे झाले आहेत. विल्यमसन यांनी सहकाऱ्यांना धमकावल्याच्या आरोपांचा निष्पक्ष आणि स्वतंत्र तपास व्हावा म्हणून मी मंत्रिपदावरून पायउतार होत असल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे.