ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २७ - अॅपलचं जगप्रसिद्ध उत्पादन असलेल्या आयफोनच्या विक्रीमध्ये 9 वर्षांमध्ये पहिल्यांदाच 16.33 टक्के घट झाली आहे. तर २००3 नंतर पहिल्यांदाच अॅपल या कंपनीचा नफा घसरला आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत 5.12 कोटी आयफोनच्या विक्रीची नोंद झाली. मागच्या वर्षी याच तिमाहीत 6.12 कोटी आयफोन्सची विक्री झाली होती.
हँण्ससेटची विक्री कमी झाल्याने नफ्यातही घसरण झाली आहे. मार्चच्या तिमाहीत अॅपलचा निव्वळ नफा १०.५ अब्ज डॉलर झाला. मागच्या वर्षी हाच नफा १३.६ अब्ज डॉलर्स होता.
आयफोनने सातत्याने अॅपलला मोठा नफा मिळवून दिला आहे. नफा आणि बाजार मूल्य लक्षात घेता अॅपल ही या क्षेत्रातली जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले असून अॅपलच्या शेअरचा भाव 6 टक्क्यांहून जास्त घसरला.
अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी जागितक बाजारातल्या मंदीचा फटका बसल्यामुळे आयफोनच्या विक्रीत घट झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.