संयुक्त राष्ट्रसंघ : संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) प्रथमच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. आंबेडकर हे वंचितांसाठीचे ‘वैश्विक प्रतीक’ असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युनो भारतासोबत काम करण्यास बांधील आहे, असे प्रतिपादन युनोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी केले. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त युनोतील भारतीय मंडळाने (मिशन) प्रथमच येथे विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना युनो डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (यूएनडीपी) प्रशासक हेलेन क्लार्क म्हणाल्या की, डॉ. आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे युनोत आयोजन केल्याबद्दल मी संस्थेच्या वतीने भारताला शुभेच्छा देते. क्लार्क युनोच्या आगामी सरचिटणीसपदाच्या शर्यतीत सहभागी आहेत. त्या म्हणाल्या की, आम्ही २०३० चा अजेंडा व जगभरातील गरीब आणि वंचित नागरिकांसाठी आंबेडकरांचे विचार सत्यात उतरविण्यासाठी भारतासोबतची भागीदारी कायम ठेवण्यास बांधील आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची १२५ वी जयंती बुधवारी येथे साजरी करण्यात आली. कल्पना सरोज फाऊंडेशन आणि फाऊंडेशन आॅफ ह्यूमन होरिझोन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुत्सद्दी, विचारवंत व आंबेडकर अनुयायांना संबोधित करताना क्लार्क म्हणाल्या की, हा सोहळा अशा महामानवाच्या वारशाची आठवण करून देतो ज्याने सशस्त्र उठाव व सततची विषमता देश, तसेच लोकांच्या आर्थिक-सामाजिक संपन्नतेसमोर मूलभूत आव्हान निर्माण करते ही बाब समजून घेतली होती. आंबेडकरांचे विचार ६० वर्षांपूर्वी जेवढे समकालीन होते तेवढेच ते आजही आहेत यावर जोर देताना न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान क्लार्क म्हणाल्या की, वंचितांचे सबलीकरण, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, तसेच कामगार कायद्यात सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाला चालना देण्यासाठी आंबेडकरांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे ते भारत आणि इतर देशातील वंचितांसाठी आदर्श प्रतीक ठरले आहेत.
युनोत प्रथमच आंबेडकर जयंती
By admin | Published: April 15, 2016 4:08 AM