ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ११ - जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढली आहे. रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये ही व्याघ्रगणना करण्यात आली असून वाघांची संख्या 3890 वर पोहोचली आहे. संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने व्याघ्रगणनेत सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आल्याची माहिती वन्यजीन संवर्धन गटाने दिली आहे.
2010मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या 3200 होती. महत्वाची गोष्ट म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचं खूप मोठं योगदान असून अर्ध्यापेक्षा जास्त वाघ भारतामध्येच आहे. भारतामधील जंगलांमध्ये एकूण 2226 वाघ आहेत.
या सर्व्हैमुळे पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. 19व्या शतका जगभरातील जंगलात एकूण एक लाख वाघ होते. वाघांची संख्या वाढली आहे यापेक्षा आपण योग्य दिशेन वाटचाल करत आहोत हे महत्वाचं आहे असं वन्यजीन संवर्धन गटाचे हेमली यांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये 13 देशातील प्रतिनिधींची मंगळवारी बैठक होणार आहे त्याअगोदरच ही जागतिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
2010 मध्ये वाघांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व देशांनी संवर्धन गटाशी हातमिळवणी करुन 2022 पर्यंत वाघांची संख्या वाढवण्याची शपथ घेतली होती. हॉलिवूड अभिनेता लिओनार्डोनेदेखील या अभियानात सहभागी झाला होता. वाघ अत्यंत महत्वाचा आणि प्रिय प्राणी आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे हे पाहून अभिमान वाटतो, मात्र आपल्याला अजून भरपूर काही करायचं आहे असं लिओनार्डो बोलला आहे.
वाघांची संख्या वाढली असली तरी अनेक देशांनी यामध्ये हातभार लावलेला नाही. पाहणीमध्ये रशिया, भारत, भुतान, नेपाळमध्ये वाघांची संख्या वाढल्याचं समोर आलं आहे. 2014मध्ये करण्यात आलेल्या गणनेच्या आधारावर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
विविध देशांमधील वाघांची आकडेवारी :
देश | वाघांची संख्या |
भारत | 2226 |
रशिया | 433 |
इंडोनेशिया | 371 |
मलेशिया | 250 |
नेपाळ | 198 |
थायलंड | 189 |
बांगलादेश | 106 |
भूटान | 103 |
चीन | ७ हून अधिक |
व्हिएतनाम | ५ हून कमी |
लाओस | 2 |
कंबोडिया | 0 |
म्यानमार सरकारने 2010 मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार 85 वाघ होते मात्र जुनी आकडेवारी असल्याने ग्राह्य धरलेली नाही.