इस्लामाबाद - दहशतवादाच्या मुद्द्यावरून सध्या पाकिस्तानची चहुबाजूनी कोंडी झालेली आहे. भारताविरोधात कारवाया करण्यासाठी पाकिस्तानदहशतवाद पोसत असल्याचे सातत्याने समोर येऊ लागल्याने पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या असून, एफएटीएफचे निर्बंध टाळण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. दरम्यान, १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे.दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी देखरेख ठेवून असणाऱ्या एफएटीएफ या संस्थेच्या कारवाईची टांगती तलवार पाकिस्तावर आहे. त्यामुळे या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना आणि हाफिझ सईद, मसूद अझहर आमि दाऊद इब्राहिमसह अन्य काही बड्या दहशतवाद्यांवर कारवाईचा बडगा उगारत कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तसेच पाकिस्तान गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिम हा आपल्याकडे असल्याची बाब सातत्याने नाकारत होता. मात्र आज पहिल्यांदाच पाकिस्तानने दाऊद हा आपल्या देशात लपून बसला असल्याचे खुलेपणाने मान्य केले आहे.पाकिस्तानने ही कारवाई एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी केल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना, मसूद अझह, हाफिझ सईद, दाऊद इब्राहिम यांच्यासारख्या कुख्यात दहशतवाद्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आणि त्यांची बँक खाती सील करण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबत १८ ऑगस्ट रोजी दोन अधिसूचन प्रसिद्ध करत २६ नोव्हेंबक २००८ च्या दहशतवादी हल्यातील एक सूत्रधार हाफिझ सईद, जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आमि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर निर्बंध घालण्याची घोषणा केली होती.१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो नागरिक मारले गेले होते. तसेच संपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, या हल्ल्यामागील सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये असल्याचे भारताकडून वारंवार सांगण्यात येत होते. मात्र भारताचे हे म्हणणे पाकिस्तानकडून सातत्याने फेटाळून लावण्यात येत होते. मात्र आज पाकिस्तानने स्वत:च कबुली दिल्याने ही बाब खरी असल्याचे सिद्ध झाले आहे.
दाऊद इब्राहिमचे वास्तव्य आमच्याच देशात, पाकिस्तानने पहिल्यांदाच दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 7:55 PM