ऑनलाइन लोकमत
बाल्टिमोर,दि. १८ - आत्तापर्यंत तुम्ही हृदयाचे,किडणीचे प्रत्यारोपण करण्यात आल्याचे वाचले असेल किंवा पाहिले असेल. मात्र आता मानवाच्या शरिरात असणा-या अत्यंत्य संवेदनशील अशा भागाचे प्रत्यारोपण करण्यास अमेरिकेचे डॉक्टर धजले आहेत. अमेरिकेत पहिल्यांदाच एका व्यक्तीवर गुप्तांगाचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे.
अमेरिकेतील जॉन्स हॉकीन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,एका स्फोटात जखमी झालेल्या एका सैनिकावर गुप्तांगाचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने आपल्या अवयवांचे दान केले. यामध्ये त्याचे गुप्तांग सुद्धा आहे. आम्ही आता जखमी असलेल्या या सैनिकावर गुप्तांगांचे प्रत्यारोपण करणार आहोत. यामुळे या सैनिकाला योग्यरित्या मूत्रविसर्जन करता येणार आहेत. तसेच, संवेदना जाणवू शकणार आहेत आणि सेक्सचा आनंद सुद्धा घेता येणार आहे. यासाठी आम्हाला त्याच्या शरिरातील सूक्ष्म अशा रक्तवाहिन्या आणि नसांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अफिगाणास्तानमध्ये हा सैनिक तैनात असताना झालेल्या बॉम्बस्फोटात त्याच्या गुप्तांगाला जखम झाली.त्यामुळे गुप्तांगातून होणा-या महत्त्वाच्या क्रिया बंद पडल्या आहेत.
आत्तापर्यंत जगभरात दोनवेळाच गुप्तांगाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. पहिल्यांदा २००६ मध्ये करण्यात आले. मात्र ते अयशस्वी झाले. त्यानंतर दुस-यांदा २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलेले यशस्वी झाले होते. आता अमेरिकेत पहिल्यांदाच होणार आहे.