संयुक्त राष्ट्रे : भारतीय घटनेचे शिल्पकार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रात प्रथमच साजरी केली जाणार आहे. त्यात ‘टिकाऊ विकास आणि सामाजिक असमता’ या विषयावर एक पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या ‘स्थायी मिशन कल्पना सरोज फाऊण्डेशन आणि फाऊण्डेशन फॉर ह्युमन होराईजन’च्या सहकार्याने आंबेडकर जयंतीच्या एक दिवस अगोदर १३ एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाईल.यानिमित्ताने तेथे ‘टिकाऊ विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामाजिक असमानतेविरुद्ध लढाई’ या विषयावर एक पॅनल चर्चा आयोजित करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. (वृत्तसंस्था)भारतीय आपल्या ‘राष्ट्रीय प्रेरणास्रोतांची १२५ वी जयंती साजरी करीत असून, ते कोट्यवधी भारतीय व जगभरातील समानता व सामाजिक न्यायाच्या समर्थकांसाठी प्रेरणा बनले आहेत, असे भारतीय मिशनतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, २०३० पर्यंत गरिबी, सामाजिक आणि आर्थिक असमानता संपुष्टात आणण्याचा निर्धार संयुक्त राष्ट्रांनी केला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टीही याच उद्दिष्टांवर होती. संयुक्त राष्ट्रांनी केलेला ठराव आणि डॉ. आंबेडकर यांचे उद्दिष्ट एकच आहे. हा एक अभूतपूर्व योगायोग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते.
युनोत प्रथमच आंबेडकर जयंती साजरी होणार
By admin | Published: April 10, 2016 3:50 AM