लंडन : कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ही लस शरीरातील इम्यून सिस्टिम सक्रिय करेल व त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कर्करोगाच्या गाठी नष्ट होतात, असे त्यांचे म्हणणे आहे. ही लस यशस्वी ठरल्यास कर्करोगांसाठी ही एक महान देणगी ठरणार आहे.या लसीचा प्रयोग कर्करोग झालेल्या एका महिलेवर करण्यात आला आहे. एखाद्या रुग्णाला लस दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कर्करोगाचा नायनाट करण्याचे या संशोधनामागे सूत्र आहे.या लसीत एक खास प्रकारचे प्रोटीन एन्झाईम असून तो कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो. या इंजेक्शनमुळे शरीरात अशा अॅन्टीबॉडिज बनतील की त्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतील. या अॅन्टीबॉडिज कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करतील, पण शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पेशी नष्ट करणार नाहीत. ही चाचणी यशस्वी होवो की न होवो, पण ती नक्कीच सुरक्षित असल्याचा आमचा विश्वास असून आम्हाला या चाचणीच्या निष्कर्षाची प्रतीक्षा आहे, असे एका शास्त्रज्ञाने सांगितले.या भयावह रोगावर अद्याप खात्रीशीर उपचार सापडलेले नाहीत, त्यामुळेच या लसीच्या निष्कर्षाकडे लक्ष लागले आहे, असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी सांगितले, हा सारा वृत्तांत ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या संशोधकांच्या पथकातील एक आघाडीचे संशोधन सर्गियो क्यू जादा म्हणाले की, आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचारांमध्ये ही उपचार पद्धती विशिष्ट पद्धतीची असून पहिल्यांदाच ती अवलंबिण्यात आली आहे. आमच्यासाठी हा एक अभूतपूर्व अनुभव असून तो यशस्वी ठरण्यास केवळ ट्यूमर नष्ट करणाऱ्या अॅन्टीबॉडीज तयार करण्यावर भर देऊ.हे संशोधन अजून प्राथमिक स्थितीत असून ते यशस्वी झाल्यास रुग्णांना कर्करोगापासून मुक्ती मिळणार आहे. केली वॉटर (३५) या महिलेला गेल्या वर्षी जुलैमध्ये अॅडव्हान्स सर्व्हायकल कॅन्सर झाला होता. कर्करोगाची लस देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तीस लोकांच्या यादीत तिचा समावेश होता. केली स्वत: खूपच आनंदी असून तिला याचा खूपच अभिमान वाटत आहे. ती म्हणाली की, ही लढाई कर्करोग निश्चित हारेल, असा मला विश्वास वाटतो. समजा असे न झाल्यास मी अन्य रुग्णांसाठी प्रेरणा ठरेन.
कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित
By admin | Published: March 05, 2016 2:50 AM