काठमांडू : नेपाळच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी ‘सीपीएन-यूएमएल’च्या उमेदवार विद्यादेवी भंडारी यांनी बाजी मारली. प्रतिस्पर्ध्याचा १०० हून अधिक मतांनी पराभव करत देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. भंडारी सीपीएन-यूएमएलच्या उपाध्यक्ष आणि पक्षाचे दिवंगत सरचिटणीस मदन भंडारी यांच्या पत्नी आहेत. निवडणुकीत त्यांना ३२७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी व नेपाळी काँग्रेसचे उमेदवार कुलबहादूर गुरूंग यांना २१४ मते मिळाली. नेपाळला प्रजासत्ताक घोषित करण्यात आल्यानंतर २००८ मध्ये देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष निवडण्यात आले होते. २० सप्टेंबरला घटना लागू होण्यासह संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर एक महिन्याच्या आत नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाणे आवश्यक होते. (वृत्तसंस्था)
नेपाळमध्ये प्रथमच महिला राष्ट्राध्यक्ष
By admin | Published: October 28, 2015 10:03 PM