वॉशिंग्टन : सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्थांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे. लष्कराशी संबंधित उपकरणांवर काम करणाऱ्या या संस्थांना राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून काळ्या यादीत टाकण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.अमेरिका सरकारच्या वाणिज्य विभागाने ही कारवाई केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पुढील आठवड्यात चर्चा होत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. या चर्चेवर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या संस्थांत सुपर कॉम्प्युटर निर्माती संस्था सुगॉनचा समावेश आहे. सुगॉन ही कंपनी मोठ्या प्रमाणात अमेरिकी पुरवठ्यावर अवलंबून आहे. सुगॉनच्या पुरवठादारांत इंटेल, एनव्हिडिया आणि अॅडव्हॉन्सड मायक्रो डिव्हायसेस यांचा समावेश आहे. याशिवाय वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि सुगॉनच्या तीन उपकंपन्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.अमेरिकी वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, सुगॉन आणि वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट या संस्था चीनच्या लष्करी संशोधन संस्थेच्या मालकीच्या आहेत. चिनी लष्करासाठी पुढील पिढीतील उच्चक्षमता असलेली संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम या संस्था करीत आहेत.जागतिक जोखीम अभ्यासक युरोशिया समूहाचे तंत्रज्ञान विश्लेषक पॉल ट्रायोलो यांनी सांगितले की, आण्विक सिम्युलेशन्स, क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक असलेली गणन यंत्रणा आणि हायपरसॉनिक अलगोरिदम विकसित करण्याच्या कामात या संस्था गुंतलेल्या आहेत. संगणकशास्त्रात प्रभुत्व मिळविण्याची ही स्पर्धा आहे. चीन याला आत्यंतिक महत्त्व देताना दिसत आहे. त्यासाठी सुगॉनसारख्या अनेक कंपन्यांना चीन सरकार पाठबळ देत आहे.
सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्था अमेरिकेच्या काळ्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 5:49 AM