ब्रुसेल्स : पॅरिससारख्या हल्ल्याच्या शक्यतेने बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये सोमवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. सार्वजनिक वाहतूक, शाळा-महाविद्यालये व मॉल्स बंद असल्यामुळे शहरात अघोषित बंदसारखी स्थिती होती. दरम्यान, पोलिसांनी दहशतवाद प्रतिबंधक धाडसत्र सुरूच ठेवत आज आणखी पाच जणांना अटक केली. मात्र यात पॅरिस हल्ल्यातील फरार संशयित सलाह अब्देलहमीद याचा समावेश नसून तो अद्याप भुमिगतच आहे. काल रात्रीच्या धाडसत्रात १६ संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.अब्देल हमीदसह पॅरिसचे अनेक हल्लेखोर ब्रुसेल्सचे रहिवासी आहेत. या हल्ल्याचा सूत्रधार पोलिसांसोबत चकमकीत मारला गेला होता. पॅरिसमध्ये बोलताना ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सिरियात इस्लामिक स्टेटविरुद्ध हवाई हल्ले सुरू करण्याचे संकेत दिले. ब्रुसेल्समध्ये आजही धाडी टाकण्यात आल्या. शेकडो सैनिक गस्त घालत असताना सुरक्षा पथके सलाहसह पॅरिस हल्ल्यातील इतर संशयितांच्या शोधार्थात घरे पिंजून काढत होती. बेल्जियम सरकारने दहशतवादी हल्ल्याचा धोका गंभीर व अटळ असल्याचे सांगत राजधानीत सोमवारीही सतर्कतेचे आदेश कायम ठेवल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ शकले नाही. (वृत्तसंस्था)पोलिसांनी पॅरिस हल्ल्यातील तिसऱ्या हल्लेखोराची ओळख पटविण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. हा हल्लेखोर नॅशनल स्टेडियमवरील हल्ल्यादरम्यान मारला गेला होता. पोलिसांनी या हल्लेखोराचा फोटो टष्ट्वीटरवर टाकला असून लोकांना त्याच्याविषयी माहिती असल्यास ती कळवावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, फ्रान्सने सिरियातील बॉम्बहल्ले तीव्र केले आहेत.
ब्रुसेल्समध्ये आणखी पाच अटकेत
By admin | Published: November 24, 2015 12:00 AM