बगदाद - इराणमधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक असलेले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने हत्या केली. सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे. इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकी दूतावासाजवळ पाच रॉकेट डागल्याची माहिती मिळतं आहे. तसेच इराणने हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. सुलेमानींच्या हत्येनंतरही इराणने अशीच कारवाई केली होती.
इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. अमेरिकेने या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर 34 सैनिक जखमी झाल्याचं मान्य केलं होतं. मंगळवारीदेखील इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ दोन रॉकेट डागण्यात आले होते. यात कोणी जखमी झालं नव्हतं पण इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला होता. इराणी सैन्याने काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथे असलेल्या तळांवर रॉकेट हल्ला केला होता. इराणकडून अमेरिकेच्या या तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली. यामध्ये चार जण जखमी झाले होते. जखमींमध्ये दोन एअरमॅन आणि दोन इराकी अधिकाऱ्यांचा समावेश होता. या हल्ल्याची कुठलाही गट किंवा संघटनेने जबाबदारी घेतलेली नव्हती. मात्र हा हल्ला इराकमधील इराणचा पाठिंबा असलेल्या गटाने केल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता.
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार इराकमधील अल बलाद एअरबेसवर अमेरिकेच्या लष्करी तळांवर एकूण 8 रॉकेट सोडण्यात आले. ज्यामध्ये चार जण जखमी झाले होते. अल बलाद एअरबेस इराकमधील एफ-16 विमानांचा मुख्य तळ आहे. इराकने ही विमाने अमेरिकेकडून खरेदी केली होती. अल बलाद येथील तळावर अमेरिकन हवाई दल आणि कंत्राटदारांचे एक पथकही आहे. मात्र यापैकी अनेक जणांना अमेरिका आणि इराणध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर या तळावरून हटवण्यात आले आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला असतानाच बुधवारी इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान कोसळून 176 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर युक्रेनचे हे प्रवासी विमान चुकून पाडल्याची कबुली इराणने दिली होती. हे विमान उड्डाण करीत असताना तेहरानजवळील लष्करी तळाच्या दिशेने अचानक वळल्याने ते पाडले गेले असावे, असेही इराणने म्हटले होते. इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना बगदादजवळ ड्रोन हल्ला करून अमेरिकेने ठार केले. त्याचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर लगेचच युक्रेनचे विमान इराणमध्ये कोसळले होते.
महत्त्वाच्या बातम्या
प्रजासत्ताक शक्ती आणि संस्कृतीचा मिलाफ; राजपथावरील नयनरम्य सोहळ्यात संरक्षण दलांनी दाखविले अजोड साहस
‘अवनी’चा अहवाल न दिल्यास निधी रोखणार; राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचा इशारा
चार शक्तिशाली स्फोटांनी आसाम हादरले, उल्फाने (आय) स्वीकारली जबाबदारी
Delhi Election 2020: कोट्यधीश उमेदवारांमध्ये आप-भाजपचाच बोलबाला; धर्मपाल लाकडा २९० कोटींचे मालक
चीनमध्ये वन्य प्राण्यांच्या व्यापारावर बंदी; कोरोना बळींची संख्या ५६, आजाराच्या विळख्यात १७ शहरे