दुबई : यूएईने टुरिझम हब वाढविण्याकडे भर दिला आहे. यासाठी कोणत्याही देशातील नागरिकांसाठी पाच वर्षांची मर्यादा असलेली मल्टीपल एन्ट्री व्हिसा योजना लागू केली आहे. दुबई सरकारच्या मीडिया ऑफिसकडून यासंदर्भातील माहिती ट्विटच्या माध्यमातून कळविण्यात आली आहे. त्यामुळे आता यूएईत जाणाऱ्यांसाठी खूशखबर आहे.
दुबई सरकार आणि यूएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या हवाल्यानुसार मीडिया ऑफिसने ट्विट केले आहे. "शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या अध्यक्षतेखाली यूएईच्या कॅबिनेटने यूएईसाठी टूरिस्ट व्हिसामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये नवीन टूरिस्ट व्हिसा 5 वर्षांसाठी मर्यादित असेल आणि या माध्यमातून अनेकदा एन्ट्री केली जाऊ शकते. तसेच, हे प्रत्येक देशातील नागरिकांसाठी खुले आहे." असे ट्विट करण्यात आले आहे.
याचबरोबर, यूएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी ट्विटरवरून सांगितले की, "प्रत्येक वर्षी यूएईमध्ये 21 मिलियन म्हणजेच 2 कोटी 10 लाख टुरिस्ट येतात." दरम्यान, ऑक्टोबर 2020 मध्ये दुबईमध्ये 'एक्स्पो 2020' चे आयोजन करण्यात आले आहे. हे मोठ्या बजेटचे आयोजन असून ग्लोबल ट्रेड फेअर आहे.