बिजिंग - चीनमधील यिवू शहरात जुनवई हॉटेलबाहेर भारतीयांनी तिरंगा फडकवला. चीनच्या धरतीवर तिरंगा फडकवताना या भारतीयांची छाती अभिमानाने फुगली होती. चीनमधील यिवू शहरात विविध कामासाठी आलेल्या आणि येथील मातीशी नाते जोडलेल्या भारतीयांनी एकत्र येत 72 व्या स्वातंत्र्याचा वर्धापनदिन चीनमध्ये दिमाखात साजरा केला. यावेळी नागरिकांनी ध्वजारोहण करत राष्ट्रगीतही म्हटले.
मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली सध्या चीनला गेले असून त्यांनी खास लोकमतला चीनवरुन ही माहिती दिली. गलगली यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात पंडित धर्मसागर ओझा, व्यापारी अब्दुला खान, हॉटेलचे मालक राजीव गुलाटी, सुभाष गायकवाड, फरीद खान, आसिफ शेख आदी उपस्थित होते. यावेळी चीनचा ध्वजही फडकविण्यात आला. या ध्वजारोहण कार्यक्रमाला चीनी नागरिकसुद्धा सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर भारतीयांनी चीनी नागरिकांना लाडू वाटून त्यांचे तोंड गोड केले. दरम्यान, परदेशातील भूमीवर आपला तिरंगा फडकवताना एक वेगळाच अभिमान भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून आला.