युट्रेक्ट : नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरात गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी दहशतवादविरोधी पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. तसेच, नागरिकांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती युट्रेक्ट पोलिसांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवरुन दिली आहे. याचबरोबर, पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून तपास सुरु केला आहे. या हल्ल्यामागे दहशतवादी हल्ल्याचा उद्देश असू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे.
या घटनेनंतर युट्रेक्टमधील ट्राम वाहतूक थांबवण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरामधील दोन मशिदींमध्ये माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 49 जण ठार झाले. तर, 20हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.उजव्या विचारसरणीच्या ऑस्ट्रेलियन नागरिकाने मुस्लिमांविषयीच्या रागातून हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले होते.