जपानमध्ये एक दुर्मिळ आजार झपाट्याने पसरत आहे. Flesh-Eating Bacteria म्हणजेच मांस खाणारा बॅक्टेरिया असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे संपूर्ण जगभरातच पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॅक्टेरियामुळे स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (Streptococcal Toxic Shock Syndrome - STSS) होतो. ज्यामुळे फार कमी वेळात रुग्णांसाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण होते.
तज्ज्ञांच्या मते, या आजाराची लागण झाल्यापासून ४८ तासांत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. जून २०२४ पर्यंत जपानमध्ये STSS ची ९७७ प्रकरणं आधीच नोंदवली गेली आहेत, जी मागील वर्षातील नोंदवलेल्या ९४१ प्रकरणांपेक्षा जास्त आहे. यामुळे चिंता वाढली आहे कारण जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजच्या मते, जर वेगाने प्रकरणं वाढत राहिली, तर यावर्षी देशात STSS ची २५०० प्रकरणं नोंदवली जाऊ शकतात. रोगामुळे मृत्यूदर ३० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा धोका आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, कोरोना साथीच्या दरम्यान लादलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर जपानमध्ये STSS प्रकरणं ही वाढत आहेत. मात्र, याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.
काय आहेत लक्षणं?
STSS ची सुरुवातीची लक्षणं फ्लूसारखी असू शकतात, त्यात ताप, स्नायू दुखणे आणि घसा खवखवणे यांचा समावेश होतो. परंतु यानंतर लक्षणं वेगाने गंभीर होऊ शकतात, ज्यामध्ये खूप जास्त ताप येणं, रक्तदाब कमी होणं, त्वचा लाल होणं आणि डेड टिश्यू दिसणं यांचा समावेश होतो.
कसा करायचा बचाव?
सध्या या बॅक्टेरियाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु हे टाळण्यासाठी, नियमितपणे आपले हात धुणे आणि कोणत्याही प्रकारची जखम स्वच्छ ठेवणे हे बऱ्याच प्रमाणात प्रभावी ठरू शकतं. याशिवाय संसर्गाची लक्षणं दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या.