लंडन - व्हॅलेंटाइन डे म्हणजे आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आवडत्या व्यक्तीसंबंधी असलेल्या भावनांना वाट मोकळी करुन देण्यासाठी अनेकजण या दिवसाची वाट पाहत असतात. मग अशावेळी समोरील व्यक्तीला ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट किंवा एखादं सरप्राईज प्लान केलं जातं. पण वर्षातील हा सर्वात रोमॅण्टिक दिवस साजरा करण्यासाठी वर्जिन अटलांटिक फ्लाईटने मात्र अवकाश गाठलं. कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने त्यांनी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या असून आकाशी उंची गाठली.
अवकाशात हार्ट शेप काढण्यासाठी एका विशिष्ट मार्गाने उड्डाण करणं गरजेचं होतं. यासाठी वर्जिन अटलांटिक फ्लाईटने लंडनच्या गॅटविक विमातळावरुन उड्डाण केलं. युकेच्या दक्षिणपश्चिम किनारपट्टीवरुन उड्डाण करण्याचा मार्ग त्यांनी निवडला होता. एअरबस A330 विमानाने सकाळी 11.30 वाजता लंडनहून उड्डाण केलं. हार्ट शेप काढण्यासाठी त्यांना जवळपास दोन तास लागले. जवळपास 100 मैल प्रवास विमानाला करावा लागला. मात्र त्यांची ही मेहनत वाया गेली नाही आणि अवकाशात एक सुंदर ह्दयाचा आकार त्यांनी काढला.
विमानाचा प्रवास एअर ट्राफिक मॉनिटरिंग पोर्टल 'फ्लाईट रडार 24' ने रेकॉर्ड केला असून त्यांनी स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या फोटोत विमानाने काढलेला हार्ट शेप स्पष्टपणे दिसत आहे.
वर्जिन अटलांटिक फ्लाईटने घेतलेल्या या मेहनतीचं कौतुक होत असताना काहीजण मात्र याची काही गरज नव्हती असं म्हटलं आहे. उगाच इंधन आणि वेळ वाया घालवण्याची गरज नव्हती असा टोला काही युजर्सनी मारला आहे. कंपनीने मात्र हे ट्रेनिंगचा भाग होता असं सांगितलं आहे.