पाकिस्तान सध्या पुराच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूला पाणी आणि पाणी दिसत आहे. लोक अन्नपाण्यासाठी तडफडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने पाण्यामुळे अराजकता कशी निर्माण होत आहे हे सांगितले आहे आणि शहरांमधून पुराचे पाणी काढण्यासाठी किमान 6 महिने लागू शकतात असेही म्हटले आहे.
पुरामुळे पाकिस्तानमध्ये सुमारे 3 कोटी लोक बेघर झाले आहेत. डॉनमधील वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी रविवारी सांगितले की, प्रांतातील पूरग्रस्त भागातून पाणी बाहेर काढण्यासाठी तीन ते सहा महिने लागतील. मात्र, पुराचे पाणी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू असल्याचेही ते म्हणाले. सिंध हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला प्रांत आहे, जिथे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरातील 1396 मृत्यूंपैकी 578 मृत्यू एकट्या सिंधमध्ये झाले आहेत.
देशभरात एकूण 12728 लोक जखमी
एनडीएमएच्या ताज्या अपडेटनुसार, सिंधमध्ये जखमींची संख्या 8321 आहे, तर देशभरात एकूण 12728 लोक जखमी झाले आहेत. कराचीमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सद्यस्थिती आणि भीषण पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनीही जगाला पाकिस्तानला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
सुमारे 35 मिलियन लोक विस्थापित
सुमारे 35 मिलियन लोक विस्थापित झाले आहेत, तर लाखो एकर सुपीक जमिनीला पुराचा फटका बसला आहे. ते पुढे म्हणाले की, सिंधमधील शेतकऱ्यांचे सुमारे 3.5 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे, तर पशुधन क्षेत्राचे 50 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. काही भागात किमान आठ ते दहा फूट पाणी आहे.
यंदा सरासरीपेक्षा 10-11 पट पाऊस
मुराद अली शाह म्हणाले की, पाकिस्तानात यावर्षी अभूतपूर्व पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा 10-11 पट पाऊस झाला. सरकार लोकांच्या पुनर्वसनावर आणि प्रांतातील मलनिस्सारण आणि सिंचन नेटवर्कवर काम करत आहे. पाणी बाहेर यायला तीन ते सहा महिने लागतील असे आम्हाला वाटते. सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कबूल केले की प्रांतात तंबू आणि औषधांचा तुटवडा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.