अबुधाबी - संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) पूर्व भागात मुसळधार पावसामुळे महापूर आला असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. पुरामुळे अनेक घरं पाण्यात बुडाली आहेत. तर काही घरांचं नुकसान झालं आहे. जागोजागी वाहने पाण्यात अडकलेली दिसत आहेत. लोकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात येत आहे. या पुरामध्ये खासगी आणि सार्वजनित संपत्तीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
यूएईमध्ये गेल्या बुधवारपासून सुरू झालेला पाऊस हा गुरुवारीदेखील सुरू होता. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पूर आला आहे. पुराचा सर्वाधिक फटका हा शारजाह, राज अल खैमाह आणि फुजैराह यासारख्या भागांना बसला आहे. राज अल खैमाहमधील अनेक भागात पावसामुळे हानी झाली आहे.
स्टॉर्म सेंटरकडून करण्यात आलेल्या नव्या ट्विटमध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले दिसत आहेत. यामधील अल बयाद येथील व्हिडीओ भयावह आहे. शारजाह पोलिसांनी स्थानिकांना देशातील पूर्व भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. एनसीएमने काही क्षेत्रांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. एनसीएमने दिलेल्या माहितीनुसार यूएईमध्ये २७ वर्षांनंतर अशा प्रकारचा मुसळधार पाऊस पडला आहे.
शारजाह पोलिसांनी लोकांना सुरक्षाविषयक निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच पूरग्रस्त भागापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच लष्करही बचाव कार्यात गुंतले आहे. प्रशासनाने सुरक्षा एजन्सींना अलर्टवर ठेवले आहे.