लोकमत न्यूज नेटवर्क
युक्रेन : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, या म्हणीचा प्रत्यय रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान आला. बलाढ्य रशियाच्या सैन्यापासून बचावासाठी युक्रेनच्या सैनिकांनी भन्नाट शक्कल लढवल्याचे समोर आले आहे.
राजधानी कीव्हला रशियन सैनिकांचा वेढा पडू नये यासाठी युक्रेनने कीव्हला लागून असलेल्या एका गावात ठरवून डेमीडिव्ह धरणातील पाणी सोडले आणि पूरपरिस्थिती निर्माण केली. संपूर्ण गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक एकर जागा पाण्याखाली जाऊन सर्वत्र दलदल निर्माण झाली. त्यामुळे रशियन रणगाड्यांना कीव्हमध्ये घुसता आले नाही.
याबाबत गावात राहणारा एक माणूस म्हणाला, जर रशियाचे सैन्य नदी पार करून कीव्हला धडकले असते तर काय झाले असते याचा विचार करा. त्यामुळे राजधानी वाचविण्यासाठी आम्हाला हे करणे भाग होते. रशियाच्या आक्रमणाला तीन महिने उलटले आहेत. हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. लाखो युक्रेनियन लोक पळून गेले आहेत. बहुतांश शहरे मोडकळीस आली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या नागरिकांचे कौतुक होत आहे.
नागरिकांनी दोन महिने सोसला त्रास
- पाणी सोडल्याने अनेक जण शेतात अडकले. दोन महिन्यांनंतरही येथील नागरिकांना पुराचा सामना करावा लागला. दैनंदिन कामांसाठी लोक बोटींचा वापर करून फिरत आहेत.
- शिल्लक राहिलेल्या कोरड्या जमिनीवर नागरिकांनी फुले व भाजीपाल्याची लागवड केली. तर, ओलसर जागा मुलांना खेळाचे मैदान म्हणून सोडली होती.
- पुरामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. पण त्यामुळे रशियन सैन्यापासून बचाव करता आला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.