बँकॉक : थायलंडने आपल्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी भारत आणि दक्षिण आशियामधील देशांतील पर्यटकांना आकर्षित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडे देशातील राजकीय संकटामुळे थायलंडला येणार्या पर्यटकांची संख्या २0 ते ४0 टक्के घटली आहे. राजकीय संकटाच्या काळात देखील भारत एक मजबूत बाजार राहिला होता. त्यामुळे नवी दिल्ली आणि मुंबईतील थायलंडचे पर्यटन प्राधिकरण कार्यालय १0 ते १७ ऑक्टोबरपर्यंत नवी दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबादेत व्यापारी मेळाव्यांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मेळाव्यात थायलंडचे लग्झरी ऑपरेटर सहभागी होतील. विशेष म्हणजे दक्षिण आशियातील पर्यटक थायलंडमध्ये दररोज सुमारे सहा हजार थाई बहत (१२ हजार रुपये) खर्च करतात. या क्षेत्रासाठी थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणाचे सात कार्यालय विपणन रणनीती तयार करतील, रोड शो करतील. या तीन भागातील एक कोटी पर्यटक थायलंडला येतात. हे प्रमाण एकूण पर्यटकांच्या ४0 टक्के आहे, असे थायलंडचे पर्यटक संचालक पिचई रक्तसिन्हा म्हणाले.मलेशिया, सिंगापूर, लाओस आणि भारत हे थायलंडसाठी मोठे बाजार आहेत. थायलंडने पुढल्यावर्षी दक्षिणपूर्व आशियातून ८१ लाख पर्यटकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाणो या वर्षीच्या उद्दिष्टापेक्षा १२ टक्क्य़ांनी अधिक आहे. (वृत्तसंस्था)
पर्यटन व्यवसायाच्या उभारीसाठी भारतीय पर्यटकांवर थायलंडचे लक्ष
By admin | Published: September 09, 2014 3:41 AM