काबुल:अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान अफगाणी नागरिकांना सतत सुरक्षिततेचे आश्वासन देत असला तरी दररोज हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आज अशीच एक घटना काबुलपासून 100 किमी अंतरावर असलेल्या बागलाण प्रांतातील अंद्राब भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानकडून अफगाणी लोक गायक फवाद अंद्राबी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, तालिबानने फवाद यांच्या घरात घुसून त्यांना बाहेर ओढत आणले आणि त्यांच्या घरासमोर गोळा घालून हत्या करण्यात आली. अफगाणिस्तानचे माजी गृहमंत्री मसूद अंद्राबी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
फवादच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तालिबानी सैनिक त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी सैनिकांनी घरी चहा घेत कुटुंबातील कोणालाही हानी पोहोचवणार नाही, असे आश्वासन दिले होते. पण, आता तालिबानने करायचे तेच केले. फवाद यांचा मुलगा जवाद अंद्राबीने असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने घरात घुसून फवाद यांना ओढत घराबाहेर नेले आणि घरासमोर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. जवादने याबाबत स्थानिग तालिबानी परिषदेकडे न्यायाची मागणी केली असून, तालिबान परिषदेने मारेकऱ्याला शिक्षा करण्याचे वचन दिल्याची माहिती जवादने दिली आहे.