संयुक्त राष्ट्रे : इबोलाचा प्रसार अधिक होऊन त्याचे साथीत रूपांतर झाल्यास अन्नधान्याचा तीव्र तुटवडा निर्माण होईल व त्याचा फटका जगातील गरिबांना बसेल, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. इबोलावर नियंत्रण मिळविणे अजून शक्य झालेले नाही. आणि पश्चिम आफ्रिकेतील ७ लाख ५० हजार लोकांपर्यंत पोहोचणे संयुक्त राष्ट्राला अजून शक्य झालेले नाही, असे या इशाऱ्यात म्हटले आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रे व स्वयंसेवी संघटना यांनी जगात पसरणाऱ्या भुकेचा आढावा घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्नधान्य कार्यक्रमाच्या आफ्रिकेतील संचालिका डेनिस ब्राऊन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार इबोला उपचार केंद्रातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व बरे झालेले लोक यांना संयुक्त राष्ट्रातर्फे अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. संसर्ग झाल्यामुळे एकाकी ठेवलेले लोक, त्यांचे कुटुंबीय यांनाही अन्नधान्य दिले जाते. लायबेरिया, सिएरा लिओन व गिनिया या देशांना या रोगाचा सर्वाधिक झटका बसला आहे. या भागातील १३ लाख लोकांना अद्याप धान्यपुरवठा झालेला नाही. इबोलाच्या संसर्गामुळे शेते उजाड पडत असून, कसणारी माणसे आजारामुळे हतबल झालेली दिसत आहेत. त्यामुळे आॅक्टोबरच्या अखेरीस होणारा धान्यपुरवठा कमी होणारआहे. सिएरा लिओन येथील ४० टक्के शेते उजाड असून, त्याचा परिणाम लोकांची उपासमार होण्यात होणार आहे. येथील लोकांना कुटुंबियांना पोटभर अन्न कसे द्यावे असा प्रश्न पडला आहे. (वृत्तसंस्था)
इबोलाचा प्रसार झाल्यास अन्नधान्याचा तुटवडा
By admin | Published: October 22, 2014 5:05 AM