लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताचा शेजारी देश श्रीलंका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे देशासमोर भूकबळीचे संकट उभे राहिले आहे. पेट्रोल-डिझेलची इतकी टंचाई निर्माण झाली आहे की, पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्यात आले आहे.१९४८ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, श्रीलंका प्रथमच एवढ्या भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. श्रीलंकेतील खाद्य क्षेत्रातील महागाई २५.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. सकाळच्या एक कप चहाची किंमत १०० रुपये झाली आहे. साखर २९० रुपये किलो, तर तांदूळ ५०० रुपये किलो झाले आहे. ४०० ग्रॅम दूध पावडरचा दर ७९० रुपये झाला आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटामागे डॉलरची टंचाई हे प्रमुख कारण आहे. श्रीलंका तेल, अन्न, कागद, साखर, डाळी, औषधी इत्यादी सर्वच आवश्यक वस्तूंची आयात करतो; पण सध्या या देशाकडे आयातीसाठी विदेशी चलनच उपलब्ध नाही. मार्चमध्ये श्रीलंका सरकारकडे फक्त २.३६ अब्ज डॉलर शिल्लक आहेत. परीक्षेचे पेपर छापण्यासाठीही सरकारकडे पैसे नाहीत.दोन आठवड्यांपूर्वी येथील पेट्रोलचे दर ५० रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर ७५ रुपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. आता तेथे पेट्रोल २५४ रुपये लिटर तर डिझेल १७६ रुपये लिटर झाले आहे. पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याच्या प्रयत्नात अनेक लोकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्यात आले आहे. २० टक्के लोक स्वयंपाकासाठी इंधन म्हणून रॉकेलचा वापर करतात; पण रॉकेलही मिळेनासे झाले आहे. पेट्रोलियम जनरल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष अशोक रानवाला यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या अनुपलब्धतेमुळे सरकारला आपली एकमात्र रिफायनरीही बंद करावी लागली आहे. १२.५ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात १,३५९ रुपयांची वाढ झाली आहे. आता सिलिंडरची किंमत ४,११९ रुपये झाली आहे.चीनने हात झटकलेश्रीलंकेतील आर्थिक संकटास चीन जबाबदार असल्याचे मानले जात आहे. श्रीलंकेने चीनकडून एकूण ५ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. भारत आणि जपानचे कर्जही या देशावर आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोतबाया राजपक्षे यांनी कर्जाच्या अटी शिथिल करण्याची विनंती चीनला केली होती. तथापि, चीनने ती फेटाळून लावली.
साखर २९० रुपये तर तांदूळ ५०० रुपये किलो! भारताचा शेजारी श्रीलंका आर्थिक संकटाच्या खाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 6:03 AM