इस्लामाबाद - पंतप्रधानपदाची खुर्ची वाचवण्यासाठी पराकाष्ठा करणारे इम्रान खान यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मुस्लीम लीग नवाज पार्टीने इम्रान खान यांच्या विधानावर टार्गेट करणं सुरू केले आहे. पीएमएलएनचे अध्यक्ष आणि नवाब शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे.
इस्लामाबाद रॅलीवर निशाणा साधत शहबाज शरीफ म्हणाले की, अविश्वास प्रस्तावाविरोधात त्यांचा पक्ष इम्रान खान सरकारला समर्थन देण्यास तयार आहे. परंतु इम्रान खान यांना एक अट मान्य करावी लागेल. कोणती परदेशी शक्ती त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्याचे पुरावे समोर आणावेत. इम्रान खान यांचा दावा आहे की त्यांच्याकडे पुरावे आहेत. जे परदेशी शक्तीसोबत मिळून त्यांची खुर्ची खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पुरावे इम्रान खान यांनी सार्वजनिक करावेत असं आव्हान त्यांनी दिले आहे.
शहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी, जामियन उलेमा ए इस्लाम आणि पाकिस्तानी डेमोक्रेटिक मूवमेंटचे अध्यक्ष मौलाना फजलूर रहमान यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. इम्रान खान रॅलीत खोटी विधानं करत होते. इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारविरुद्ध सुरू असणाऱ्या परदेशी फंडिंगबाबत जनतेसमोर माहिती आणावी असं खुले चॅलेंज नवाज शरीफ यांचे भाऊ शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना दिले आहे.
बहुमतासाठी १७२ खासदारांची गरज
पाकिस्तानी संसदेत एकूण ३४२ सदस्य आहेत. बहुमतासाठी १७२ सदस्यांची गरज आहे. इम्रान खान यांचा पक्ष आणि मित्र पक्षांची आघाडी यांच्याकडे १७९ सदस्यांचे पाठबळ होते. त्यातील इम्रान खान यांच्या पक्षाकडे १५५ सदस्य आहेत. ४ सहकारी दल सोबत होते. मात्र आता ४ मित्रपक्षांपैकी ३ जणांनी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिले आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अडचणीत आले आहे.
राजीनामा देणार नाही'
रॅलेली संबोधित करताना इम्रान खान म्हणाले होते की, "आमच्या सरकारची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानच्या जनतेला देशाचा विकास दिसेल. आतापर्यंत इतर कोणत्याही सरकारने पाकिस्तानचा विकास केला नाही. मी २५ वर्षांपूर्वी राजकारणात फक्त एकाच गोष्टीसाठी आलो होतो, ती म्हणजे पाकिस्तानची निर्मिती ज्या दृष्टीकोनाने झाली ते पुढे नेणे. जे काम आम्ही तीन वर्षात केले, ते काम यापूर्वी कोणी केले नव्हते.'