दुबई : अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे नुकतेच टॉप इंडियन लीडर्स इन द मिडल इस्ट २०२१ या यादीत २५ वे मानांकन जाहीर झाले आहे. रिटेल क्षेत्रातील कटिबद्धतेद्वारे पश्चिम आशिया क्षेत्रातील प्रगतीत योगदान दिल्याबद्दल हा गौरव आहे.
फोर्ब्जतर्फे ही यादी तयार केली जाताना संबंधित नामवंतांची नक्त मत्ता (नेटवर्थ), कार्यक्षेत्रातील त्यांचे महत्त्व व योगदान, गेल्या वर्षभरातील प्रगती व कामगिरी, रोजगार निर्मितीवर घडवलेला परिणाम, सामाजिक परिणाम व इतर कंपनी सामाजिक जबाबदारी उपक्रम यांचा विचार केला जातो. डॉ. दातार यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच गेल्या वर्षात सामाजिक बांधीलकीचे स्तुत्य प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले, फोर्ब्ज मिडल इस्टने माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या प्रतिष्ठित यादीत मानांकन दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. खरंतर गेले वर्ष करोना साथीमुळे सर्वांसाठीच खडतर ठरले आणि उद्योग क्षेत्राच्या वाटचालीवरही विपरीत परिणाम झाला. माझ्या अल अदील कंपनीने हे आव्हान पेलताना सामाजिक बांधीलकीचाही विसर पडू दिला नाही. या प्रयत्नांत माझे कुटूंबीय, कर्मचारी व ग्राहक यांची मोलाची साथ मला लाभली. परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीय बांधवांना घरी सुखरुप परतता यावे यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत केली. लॉकडाऊन काळात रोजगारवंचित व निर्धन भारतीयांना खाद्यपदार्थांचे व औषधांचे हजारो संच मोफत पुरवणे, गरजूंच्या कोविड आरोग्य तपासणीचा व परतीच्या विमान तिकीटाचा खर्च उचलणे या मार्गांनी आम्ही ५००० हून अधिक भारतीयांना मायदेशी पोचवले. असहाय्य स्थितीत अनवधानाने स्थानिक कायद्याचे पालन न झाल्याने तुरुंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका करण्यासाठी आम्ही स्वयंसक्रियतेने पाठपुरावा केला व त्याला यश आले.
प्रोत्साहनाची थाप हुरूप वाढविणारीडॉ. धनंजय दातार म्हणाले की, कोविड साथी-प्रमाणेच तर अन्य कारणांनीही संकटात सापडलेल्यांना आमच्या समूहाने मदत केली. फोर्ब्जचे मानांकन ही एकप्रकारे प्रोत्साहनाची पाठीवरील थाप असून कामाचा हुरूप वाढविणारी आहे.