लंडन: कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातलं आहे. या नव्या प्रकाराचा संसर्ग अतिशय झपाट्यानं होत असल्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा एकदा सक्तीचा लॉकडाऊन लागू करत असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात जवळपास 56 मिलियन लोक इंग्लंडमध्ये परततील अशी माहिती बोरिस जॉन्सन यांनी यावेळी दिली.
बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी रात्री जनतेला संबोधित केलं. त्यांनी सांगितले की, कोरोनाचं संकट पाहता बुधवारी (6 जानेवारी) ते मार्चपर्यत लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणं, वैद्यकिय कारणं, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि कौटुंबीक हिंसेतून मदत मागण्यासाठीच्या कारणांनीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना असेल असंही त्यांनी नमूद केलं. इंग्लंडमधील शाळा, माध्यमिक विद्यालयं, महाविद्यालयं यांच्यावरही या लॉकडाऊनचे थेट परिणाम होणार आहेत. तसेच खुल्या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा प्रकारांवरही यादरम्यानं बंदी आणली गेली आहे.
नागरिकांनी किमान लसीकरण सुसूत्रतेनं सुरु होईपर्यंत तरी कमालीची सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे आवाहन बेरिस जॉन्सन यांनी केले. त्याचप्रमाणे जुन्या विषाणूशी दिलेली झुंज यशस्वीही ठरताना दिसत होती. पण, आता या विषाणूच्या एका नव्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. या विषाणूच्या संसर्गाचा वेग हा अतिशय तणावपूर्ण आणि सतर्क करणारा आहे, असा इशाराही बेरिस जॉन्सन यांनी यावेळी दिला.
दरम्यान, इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे इंग्लंडमधील एक तृतीयांश म्हणजे जवळपास 44 बिलीयन नागरिक अनंत अडचणींचा सामना करत आहेत. इंग्लंडमधील विविध रुग्णालयात सोमवारी जवळपास 27 हजार कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. हा आकडा कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील रुग्णांपेक्षा 40 टक्के अधिक आहे. गेल्या मंगळवारी अवघ्या 24 तासांत 80 हजाराहून अधिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचंही जॉन्सन यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातही नवीन कोरोनाचे रुग्ण-
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये राजेश टोपे म्हणाले, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.