ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. १ - मध्य अफ्रिकेतील सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिक या देशात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पाठवलेली 'शांती सेना'च तिथल्या नागरीकांवर अत्याचार करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिक देशातील १०० पेक्षा जास्त तरुणी आणि महिलांनी शांती सेनेवर गंभीर स्वरुपाचे लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. फ्रेंच लष्कराच्या कमांडरवर तीन मुलींना कुत्र्यासोबत सेक्स करण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
नागरीकांच्या संरक्षणासाठी पाठवलेले सैन्यच भक्षक बनत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आले आहे. राजधानी बानगुईमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पथकाने १०० पेक्षा जास्त लैंगिक अत्याचार पीडीतांशी चर्चा केली. या पीडीतांमध्ये बहुतांश अल्पवयीन मुली आहेत. अमेरिकेतील एडस फ्री वर्ल्ड या संस्थेनुसार तीन तरुणींना फ्रेंच लष्करी तळावर नेण्यात आले.
तिथे त्यांचे हात-पाय बांधून त्यांना विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर कमांडरने या तिन्ही मुलींवर कुत्र्यांसोबत सेक्स करण्याची सक्ती केली असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपावर संयुक्त राष्ट्राने चौकशी सुरु असल्याचे सांगितले पण आरोपाला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
संस्थेच्या आरोपानुसार प्रत्येक मुलीला पाच हजार सेंट्रल अफ्रिकन फ्रान्स म्हणजे नऊ अमेरिकन डॉलर देण्यात आले. संयुक्त राष्ट्रातील फ्रान्सच्या राजदूताने हा आरोप अत्यंत घृणास्पद आणि विकृत असल्याचे म्हटले असून, हा आरोप सिद्ध झाला तर, कठोर कारवाई करु असे म्हटले आहे.