नवी दिल्ली- ब्रिटनचे काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक ८८ मतांसह आघाडीवर आहेत. सध्या सुनक यांच्याशिवाय आणखी पाच दावेदार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. पहिल्या फेरीच्या मतदानात उर्वरित आठ उमेदवारांमध्ये लढत होती.
नवे अर्थमंत्री नदीम जाहवी यांना २५ तर जेरेमी हंट यांना केवळ १८ मते मिळाली. यामुळे दोघेही पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी किमान ३० खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागेल. अशातच पहिल्या फेरीत ८८ मते मिळून ऋषी सुनक हे आघाडीवर असून ते ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत.
दरम्यान, सत्ताधारी कंझर्वेटिव्ह पक्षाच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये सुनक आणि साजिद वाजिदसह सायमन हार्ट आणि ब्रैंडन लुईस आहेत. सुनक हे अर्थमंत्री होते. त्यांना ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. सुनक हे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. रशियामधील व्यवसाय, संपत्तीवरून सुनक काही महिन्यांपूर्वी वादात आले होते. सुवक हे ४२ वर्षांचे आहेत.