बीजिंग : चीनचे राष्ट्र्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मर्जीतून उतरलेले माजी पंतप्रधान ली केकियांग (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शुक्रवारी निधन झाले. अर्थतज्ज्ञ असलेले ली केकियांग यांच्याकडे एकेकाळी राष्ट्राध्यक्षपदाचे भावी उमेदवार म्हणूनही पाहिले जात असे. ते गेल्या वर्षी मार्च महिन्यात राजकारणातून निवृत्त झाले होते.
ली केकियांग हे चीनच्या पंतप्रधानपदी मार्च २०१३ ते मार्च २०२३ या कालावधीत विराजमान होते. शी जिनपिंग यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ली केकियांग यांच्याच नावाची चर्चा होत असे. केकियांग यांच्या मृत्यूबद्दल चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने तीव्र शोक व्यक्त केला आहे.
चीनचे भारतविषयक धोरण ठरविण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. राष्ट्राध्यक्षपदासाठी स्पर्धकांना खच्ची करण्याचे शी जिनपिंग यांनी ठरविले. त्यानुसार ली केकियांग यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर करण्यात आले होते.