Afghanistan Crisis: तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतासमोर देखील नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. यातच भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी तालिबान विरोधात रोखठोक विधान केलं आहे. 'तालिबानला आता चांगलंच ठावूक आहे की २००१ सालचा भारत आता राहिलेला नाही. सध्या २०२१ साल आहे आणि आता हिंदुस्तानात जे जरकार आहे ते बालाकोट सारखी कारवाई करण्यासाठी सक्षम आहे. जर त्यांनी देशात दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं प्रत्युत्तर मिळेल', असं नटवर सिंह म्हणाले.
अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी
नटवर सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानला इशारा दिला आहे. "तालिबानसोबत चर्चा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. सध्या ते अफगाणिस्तानमध्ये काय करणार आहेत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. अमेरिकेनं सैन्य मागे घेऊन मोठी चूक केली आहे. पंजशीरसारख्या भागात युद्ध सुरू झालं तर मोठी लढाई निर्माण होऊ शकते. याच पद्धतीनं जर अत्याचार सुरू राहिले तर जगात कुणीच तालिबानला मान्यता देणार नाही. त्यामुळे पुढील आठवडा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. जर त्यांनी सरकार स्थापन केलं तर परिस्थिती वेगळी असेल आणि तर ते असमर्थ ठरले तेव्हाही वेगळी परिस्थिती निर्माण होईल. यात पाकिस्तानचाही छुपा हस्तक्षेप आहे आणि तो पुढेही राहणार आहे", असं नटवर सिंह म्हणाले.
चीन आणि पाकिस्तानची खेळी''तालिबान सध्या तेच बोलत आहेत की जे जगाला ऐकायचं आहे. जगाला तालिबानच्या म्हणण्यावर विश्वास नसला तरी तालिबाननं आपली प्रतिमा चांगली दाखवण्याचा इरादा यावेळी केला आहे. त्यामुळे तालिबानला नेमकं कोण मार्गदर्शन करतं याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यांना हे सगळं कोण शिकवतंय? यामागे चीन आणि पाकिस्तानचा तर हात नाही ना? कारण तालिबान्यांनी केलेली विधानं लक्षात घेता त्यामागे काहीतरी मोठं प्लानिंग करण्यात आलेलं आहे. चीन आणि पाकिस्तानची ही खतरनाक खेळी आहे", असं नटवर सिंह म्हणाले.
"तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर जगभरातील अनेक देश आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत असतानाच चीननं तालिबानसोबत मैत्रीची घोषणा केली आहे. तर तालिबाननं अफगाणिस्तानला गुलामीतून बाहेर काढल्याचं विधान पाकिस्ताननं केलं आहे. अफगाणिस्तानात या दोन देशांचे दूतावास देखील तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर नुसते सुरू नव्हे, तर सुरळीत कामकाज देखील करत आहेत", असंही ते पुढे म्हणाले.