ल्योन (फ्रान्स) : इंटरपोलचे माजी अध्यक्ष मेंग होंगवेई यांची पत्नी ग्रेस मेंग ज्यांना एकेकाळी चीनमध्ये विशेषाधिकारांचा लाभ मिळत होता, त्यांनी आता चीन सरकारवर निशाणा साधला आहे. सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीने त्यांच्या पतीला इंटरपोलमध्ये महत्त्वाचे पद सांभाळण्यासाठी फ्रान्समध्ये पाठविले; परंतु चीनने होंगवेई यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत १३ वर्षे ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. आपल्या पतीला भेटण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या ग्रेस दोन जुळ्या मुलांसह फ्रान्समध्ये राजकीय शरणार्थी बनून राहत आहेत व चीनविरुद्ध आवाज उठवत आहेत.
होंगवेई २०१८ मध्ये बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर खटला चालविण्यात आला व त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. एकेकाळी लोक सुरक्षाविषयक उपमंत्री पदावर सेवा देणारे होंगवेई यांच्या पत्नीने चीनच्या सरकारला राक्षस व आपल्याच लेकरांना खाणारे सरकार आहे, असेही म्हटले आहे. एका विशेष मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, मागील तीन वर्षांत मी राक्षसासमवेत जगण्यास शिकले आहे. मी मरून पुन्हा जिवंत झाले आहे. माझे पती कुठे आहेत, कसे आहेत, त्यांचे आरोग्य कसे आहे, याबाबत मला माहिती नाही, असे त्या म्हणाल्या. होंगवेई आता ६८ वर्षांचे होतील. दोहोंमध्ये शेवटचा संपर्क २५ सप्टेंबर २०१८ रोजी झाला होता.