काहिरा - कोरोनामुळे जगभरातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांबरोबरच मोठ-मोठ्या लोकांचाही मृत्यू होत आहे. यातच आता लिबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांचे रविवारी रात्री उशिरा इजिप्तची राजधानी काहिरा येथे निधन झाल्याचे वृत्त आहे. ते 68 वर्षांचे होते.
माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांना कोरोनाची लागण झाली होती, असे सांगण्यात येत आहे. सिन्हुआ या वृत्त संस्थेने रविवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले, की जिब्रिल यांना काही दिवसांपूर्वीच कोरनाचा संसर्ग झाला होता. यामुळेच त्यांचे निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारीही होते. यापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर काहिरा येथील रुग्णालयात 10 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.
जिब्रील हे लिबियातील उदारमतवादी पक्षांची आघाडी असलेल्या 'नेशनल फोर्सेस अलायंस'चे प्रमुख होते. त्यांच्या मृत्यू मुळे राजकीय पक्षांत दु:ख्खाचे वातावरण आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनदेखील रुग्णालयात -इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात खुद्द त्यांच्या कार्यालयाकडूनच महिती देण्यात आली आहे. जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनीस्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती.
ट्विटमध्ये जॉन्सन यांनी म्हटले होते, की 'गेल्या 24 तासांत मला कोरोनाची काही लक्षणे जाणव आहेत. माझी कोरोना टेस्टदेखील पॉझिटिव्ह आली आहे. आता मी स्वतःला आयसोलेट करत आहे. मात्र आपण कोरोनाविरोधात युद्ध लढत असताना, मी व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने नेतृत्व करत राहील.' यानंतर डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते, की काही लक्षणे दिसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जॉन्सन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.
कोरोणामुळे जभरात मृत्यू झालेल्यांची संख्या सोमवारपर्यंत 69 हजारवर पोहोचली होती. सध्या जवळपास 12 लाख लोक कोरोना बाधित आहेत. तसेच उपचारानंतर 62 हजार जम बरेही झाले आहेत.