माले- मालदिवचे माजी राष्ट्राध्यक्ष मामून अब्दुल गयूम आणि सध्याच्या सरन्यायाधीशांना 19 महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांचा हा सगळा सत्तेवरती पकड घट्ट करण्यासाठी चाललेला खटाटोप असल्याचे मत मालदिवमध्ये व्यक्त होत आहे. अब्दुल्ला यामिन येत्या सप्टेंबरमध्ये होत असलेल्या निवडणुकीत पुन्हा विजयी होऊन सत्तेत येण्यासाठी गेले अनेक महिने धडपड करत आहेत.
गेली जवळजवळ सहा वर्षे मालदिवमध्ये राजकीय अस्थिरता आहे. मालदिवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशिद यांना सत्तेवरुन बाजूला करण्यासाठी पोलिसांनी 2012 साली बंड केले होते. मोहम्मद नाशिद हे मालदिवचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले नेते होते. केवळ 4 लाख लोकसंख्येच्या या देशात सतत राजकीय व प्रशासकीय अस्थिरता राहिली आहे नाशिद यांच्यावरही दहशतवादाचे आरोप ठेवून त्यांना 13 वर्षांची शिक्षा ठोठावली गेली होती. गयूम यांनी मालदिवचे सर्वाधीक काळ प्रशासन सांभाळले होते. आता त्यांच्याबरोबर सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद व सर्वोच्च न्यायालयाचे आणखी एक न्यायाधीश अली हमिद यांना शिक्षा ठोठावली गेली आहे. या सर्वांनी पोलीस चौकशीमध्ये आपले मोबाइल फोन पोलिसांना दिले नाहीत असा आरोप ठेवण्यात आला आहे.
नाशिद यांच्यासह नऊ विरोधीपक्षनेत्यांवरील आरोप रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यावर अब्दुल्ला यामिन यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये 45 दिवसांची आणीबाणी लादली होती. आणीबाणीच्या काळात आता शिक्षा झालेल्या तिघांना अटक करण्यात आलेली होतीय