लंडन, दि. 1 - साता-यातील भूमीपुत्र आणि सातासमुद्रापार मराठी माणसाचे नाव उंचावणा-या सदाशिवराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सदाशिवराव देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. देशमुख हे इंग्लंडमधील कॅमडेन शहराचे महापौर म्हणून कार्यभार सांभाळला होता. हे पद भूषवणारे ते पहिले मराठी व्यक्ती होते. 25 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. तर 30ऑगस्ट रोजी त्यांच्या श्रद्धांजली सभेचं कॅमडेन इथे आयोजन करण्यात आले होते. कॅमडेन शहरामध्ये ते अत्यंत प्रतिष्ठीत आणि नावाजलेले व्यक्ती होते.
20 ऑक्टोबर 1934 रोजी साताऱ्यातील खटाव तालुक्यातील निमसोड गावामध्ये सदाशिवराव यांचा जन्म झाला होता. 1962 साली त्यांनी लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये त्यांनी एल.एल.एम, एम.फील, पी.एच.डी प्राप्त केली. त्याचबरोबर लंडन स्कूल सेव्हन इकॉनोमिक, स्कूल सेव्हन आर्टिकॉन अँड ओरिएंटेड शिक्षणही पूर्ण केले. समाजसेवेचा वसा घेतलेल्या देशमुखांनी लंडनमध्ये कार्याला सुरूवात केली होती. 1994 ते 1995 या काळात त्यांनी कॅमडेनचे उपमहापौरपद भूषवले होते. त्यानंतर 1995 ते 1996 यादरम्यान देशमुख यांनी या शहराचे महापौर म्हणून काम बघितले. सदाशिवराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचा मुलगा विजयसिंह आणि मुलगी पल्लवी असा परिवार आहे. हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांचे ते काका होते.