कीव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अद्याप सुरूच आहे. रशियाच्या हल्ल्यापासून (Russian Attack) वाचण्यासाठी लोक युक्रेनमधून पलायन करत आहेत. आतापर्यंत मोठ्या संख्येने लोक युक्रेन (Ukraine) सोडून गेले आहेत. माजी मिस युक्रेन व्हेरोनिका डिडिसेन्को (Veronika Didusenko) हिचाही समावेश आहे, ज्यांना त्यांचा देश सोडण्यास भाग पाडले गेले. व्हेरोनिका डिडिसेन्को सध्या अमेरिकेत असून पत्रकार परिषदेत आपल्या व्यथा मांडताना तिने इतर देशांना मदतीचे आवाहन केले आहे.
मिस युक्रेन 2018 व्हेरोनिका डिडिसेन्को म्हणाली की, हल्ल्याच्या पहिल्या दिवशी ती आणि तिचा 7 वर्षांचा मुलगा एअर रेड सायरन आणि स्फोटांच्या आवाजाने जागे झाले. यानंतर तिने तात्काळ घर सोडले आणि इतर हजारो लोकांसह पायी सीमेवर रवाना झाली. 'आम्ही युक्रेनच्या सीमेपर्यंतचा प्रवास पायीच कव्हर केला. अशी कोणतीही जागा नव्हती, जिथे सायरन, रॉकेट किंवा बॉम्बस्फोटचा आवाज ऐकू येत नव्हता. हे अतिशय भीतीदायक दृश्य होते', असे व्हेरोनिका डिडिसेन्को हिने सांगितले.
कीव्ह सोडल्यानंतर, व्हेरोनिका डिडिसेन्को आपल्या मुलासह मोल्दोव्हाला पोहोचली, त्यानंतर तेथून स्वित्झर्लंडमधील जिनिव्हाला. आपल्या मुलाला जिनिव्हामध्ये सोडून, व्हेरोनिका डिडिसेन्को ही वुमेन्स राइट्स अॅटॉर्नी ग्लोरिया ऑलरेड (Gloria Allred ) यांच्यासोबत पत्रकार परिषदेसाठी अमेरिकेत आली. व्हेरोनिका डिडिसेन्को हिने सांगितले की, मुलाला जिनिव्हामध्ये सोडून या पत्रकार परिषदेत येण्याचा वेदनादायक निर्णय घेतला. कारण जागतिक महिला दिनी आपल्या मातृभूमीची सद्यस्थिती जगासमोर सांगणे आवश्यक वाटले.
सध्या हजारो युक्रेनियन मुले आणि त्यांच्या माता भुयारी रेल्वे स्थानकांवर आणि बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये दहशतीत आहेत. याशिवाय, बॉम्ब शेल्टरमध्ये मुलांना जन्म देणाऱ्या स्त्रिया पाहून वाईट वाटते, असे व्हेरोनिका डिडिसेन्को म्हणाली. तसेच, तिने मुलासाठी अमेरिकेत येण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळला गेला. आता ती या वीकेंडला पुन्हा जिनिव्हाला जाईल आणि आपल्या मुलाला भेटेल, असे ती म्हणाली.
'देश वाचवण्याची हिंमत आहे, पण...'व्हेरोनिका डिडिसेन्को सांगितले की, युक्रेनमधील प्रत्येक व्यक्तीने आपल्या देशाचे रक्षण करण्याचा संकल्प केला आहे, परंतु त्याला इतर देशांची मदत हवी आहे. 'युक्रेनियन लोकांमध्ये आपला देश वाचवण्याची हिंमत आहे, पण सतत होणारे हल्ले रोखण्यासाठी त्यांना शस्त्रांची गरज आहे. आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी आणि तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढू, असे व्हेरोनिका डिडिसेन्को म्हणाली. दरम्यान, अमेरिका व्हिसा धोरणात सूट देईल, जेणेकरून अधिकाधिक युक्रेनियन येथे येऊ शकतील, अशी आशा ग्लोरिया ऑलरेड यांनी व्यक्त केली आहे.