Pakistan Reaction On India Lok Sabha Election 2024 Result:जगातील सर्वांत मोठ्या मानल्या जाणाऱ्या भारताच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अगदी काही वेळात सुरू होणार आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या महानिकालावर अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. विशेष करून पाकिस्तान भारतीय निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून आहे. पाकिस्तानातील अधिकारी, मंत्री भारताच्या लोकसभा निवडणुकीबाबत सातत्याने प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. यातच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास संविधान बदलाचा अधिकार मिळेल. तसेच भारत हिंदू राष्ट्र बनेल, असा दावा पाकचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाले आणि NDAला संसदेत दोन तृतीयांश जागा मिळाल्या, तर भाजपाला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार मिळेल. भाजपाला हे बळ मिळताच ते भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यास सुरुवात करेल. भाजपा निवडणूक प्रचारात जे काही आश्वासने देते, ते सत्तेत आल्यानंतर पूर्ण करते. आजवर आपण पाहिले आहे. मोदी निवडणूक प्रचारात जे काही बोलले, ते त्यांनी आपला प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी अनुच्छेद ३७० चा उल्लेख केला होता. सत्तेत आल्यानंतर लगेचच त्याची अंमलबजावणी केली होती. मला वाटते की यावेळी त्यांची सर्वात मोठी प्राथमिकता भारताला हिंदू राष्ट्र बनवणे आहे. त्यासाठी त्यांनी खूप काम सुरू केले आहे, असे मत एजाज अहमद चौधरी यांनी व्यक्त केले.
भारत हिंदूराष्ट्र होण्यासाठी पाकिस्तानात कोणाचाही आक्षेप नाही. तिथे हिंदू बहुसंख्य असतील तर हिंदू राष्ट्र निर्माण करा. त्याने आम्हाला काय फरक पडतो? पण ते आधीच मुस्लिम आणि इतर धर्माच्या लोकांना त्रास देत आहेत. हिंदू राष्ट्रानंतर आणखी संकटे निर्माण करतील, असा दावा चौधरी यांनी केला. तसेच भाजप प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यास पाकिस्तानबाबतचा त्यांचा दृष्टिकोन तसाच राहील, त्यामुळे पाकिस्तानने आधीच तयारी करायला हवी. पाकिस्तानात घुसून मारण्याचा भारताची हिंमत वाढेल. पाकिस्तानसाठी ही चिंतेची बाब आहे. इतर देशांसाठीही ही चिंतेची बाब आहे, असे मला वाटते. पाकिस्तानने आतापासूनच तयारी सुरू करावी, असेही चौधरी म्हणाले.