PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:34 PM2024-05-29T12:34:26+5:302024-05-29T12:35:04+5:30
Pakistan Minister Fawad Choudhari News: नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा ही पाकिस्तानातील प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जींना शुभकामना आहेत, असे पाकमधील एका माजी मंत्र्याने म्हटले आहे.
Pakistan Minister Fawad Choudhari News: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. मात्र, पाकिस्तानमधील एका माजी मंत्र्याने केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वास्तविक पाहता भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतात कुणाचे सरकार येणार, पंतप्रधान मोदी यांचे सरकार राहणार की जाणार, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का, अशा अनेक गोष्टींकडे जगभरातील मिडिया आणि तेथील नेतेमंडळी बारीक लक्ष ठेवून आहेत. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानमधील फवाद चौधरी या माजी मंत्र्याने भारतातील निवडणुकीबाबत एक मोठे विधान केले आहे. या विधानामुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायला हवेत
फवाद चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा आधार घेत म्हटले आहे की, मला असे वाटते की, भारतीय मतदाराचा खरा फायदा पाकिस्तानशी संबंध सुधारण्यात आणि भारत विकसनशील देशाकडे वाटचाल करण्यातच आहे. आता हे सर्व तेव्हाच होऊ शकते जेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कट्टर विचारसरणीचा पराभव व्हायलाच हवा. आता त्यांना कोणी पराभूत करेल, मग ते राहुल गांधी असोत, केजरीवाल असोत किंवा ममता बॅनर्जी असोत, आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, जो कट्टरतावाद्यांचा पराभव करेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे फवाद चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले.
भाजपा आणि RSS पाकिस्तानबाबत द्वेष निर्माण करत आहे
सध्याचे विद्यमान सरकार केवळ मुस्लिमांमध्ये द्वेषच निर्माण करत नाही, तर पाकिस्तानबाबतही द्वेष निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत विचारधारेचा हा प्रकार पराभूत होण्याची वेळ आली आहे. भारतीय मतदार हा मूर्ख नाही, त्याला सर्व काही कळते, असे फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरचे मुस्लिम बांधव असोत किंवा उर्वरित भारतातील असोत, त्यांना सध्या कट्टरतावादी विचारसरणीचा सामना करावा लागत आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि पाकिस्तानातील प्रत्येकाची तीच इच्छा आहे. विचारधारचे अतिरेकपणा थांबेल, तेव्हाच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारू शकतील. पाकिस्तानमध्ये भारताविषयी द्वेष नाही. पण, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस आणि भाजपा पाकिस्तानबद्दल द्वेष, मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करत आहे. या विचारसरणीच्या लोकांना पराभूत करणे हे आपले कर्तव्य आहे, असे फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना पाकिस्तानकडून पाठिंबा मिळत असल्याच्या प्रश्नावर, पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, ही लोकसभा निवडणूक भारताची आहे आणि भारताची लोकशाही खूप परिपक्व आहे. एक परंपरा आहे आणि भारताच्या मतदारांवर बाहेरील कोणाचाही प्रभाव पडत नाही. मला कळत नाही की, काही मोजकेच लोक आहेत, ज्यांचे आपल्याशी वैर आहे, असे मोजकेच लोक आहेत, तिथून त्यांच्या समर्थनात आवाज का उठतो. आता ही अत्यंत गंभीर बाब आणि तपासणी करण्याची बाब आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.