Imran Khan Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधानइम्रान खान यांना काल न्यायालयाने निवडणूक लढवण्यासाठी अपत्रा ठरवत धक्का दिला होता. त्यानंतर आज त्यांना जामीन मिळाला आहे. त्यांच्यासोबत पीटीआयचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनाही जामीन मिळाला आहे. इम्रान आणि कुरेशी हे दोघेही सायफर प्रकरणात आरोपी होते. दोघांनाही प्रत्येकी १० लाख पाकिस्तानी रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने दोन्ही नेत्यांच्या जामीनाचे आदेश दिले आहेत.
सायफर केस हे काही राजकीय दस्तऐवजांशी संबंधित प्रकरण आहे, ज्यामध्ये इम्रान खान यांच्यावर राजकीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. गोपनीय कागदपत्र सार्वजनिक करून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इम्रान खान यांनी संबंधित राजकीय कागदपत्रे सरकारला परत केली नसल्याचा दावा पाकिस्तानच्या तपास संस्थेने केला आहे.
विशेष न्यायालयात झाली सुनावणी
विशेष न्यायालयाने (ऑफिशियल सीक्रेट अँक्ट) गेल्या आठवड्यातच सायफर केस प्रकरणाची सुनावणी नव्या पद्धतीने सुरू केली होती. १३ डिसेंबर रोजी इम्रान खान आणि महमूद कुरेशी यांच्या खटल्यात पुन्हा सामील झाल्यानंतर, इम्रान खान जेथे ठेवण्यात आला आहे तेथे अदियाला तुरुंगात खटला चालवला गेला. २३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात दोन्ही नेत्यांचा प्रथम समावेश करण्यात आला होता. दोघांनीही न्यायालयासमोर आरोपांची कबुली दिली नाही. अदियाला तुरुंगात खटला सुरू होता आणि चार साक्षीदारांनी त्यांचे जबाबही नोंदवले होते पण इस्लामाबाद उच्च न्यायालयाने काही कारणास्तव खटला फेटाळला होता.
इम्रान खान निवडणूक लढवणार की नाही?
पाकिस्तानात पुढील वर्षी ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधी इम्रान खान निवडणूक लढवतील याबाबत साशंकता आहे. माजी पंतप्रधान इम्रान डझनभर खटले प्रलंबित आहेत. जामीन मिळाल्यानंतर इम्रान तुरुंगातून बाहेर येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक मीडिया संस्थेने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे यावर अजूनही साशंकता आहे.