इस्लामाबाद, दि. 18 - पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर लाहोरमधल्या पोटनिवडणुकीकडे सगळयांचे लक्ष लागले होते. या पोटनिवडणुकीत नवाझ यांची पत्नी कुलसूम शरीफने बाजी मारली आहे. 2018 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्याआधी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शरीफ यांना पुढची निवडणूक आपल्यासाठी कशी असेल याची चाचपणी करता आली.
कुलसूम शरीफ विजयी झाल्या असल्या तरी, त्यांचे मताधिक्क्य घटले आहे. इतर निवडणुकीच्या निकालांप्रमाणे हा एक सामान्य विजय नाहीय. पीएमएल-एनच्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. त्यांचे अपहरण झाले होते तरीही कुलसूम विजयी झाल्या असे शरीफ यांची मुलगी मरीअमने सांगितले. तुम्ही फक्त निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यानाच नव्हे तर, अनेक अदृश्य शक्तींचा पराभव केला आहे असे मरीअमने म्हटले आहे.
कुलसूम निवडणूक लढवत असल्या तरी, त्या प्रचारात सक्रीय नव्हता. त्यांच्यावर लंडनमध्ये कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. लाहोरचा मतदारसंघ शरीफ कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. कुलसूम यांना 53.5 टक्के मते मिळाली. 2013 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाला इथे 61 टक्के मते मिळाली होती. सध्या शरीफ कुटुंबातच राजकीय संघर्ष सुरु आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांचे बंधु शहाबाज शरीफ यांच्याकडे नवाझ यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. पण आता पाकिस्तानात नवाझ शरीफ यांनी स्वत:च आपले बंधू शहाबाज शरीफ यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवले. नवाझ शरीफ यांनी आपले बंधू शहाबाज यांनाच दूर ठेवले नाही तर, शहाबाज यांचा मुलगा हमझा शरीफचेही स्वप्न मोडले. शहाबाज यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर पंजाब प्रातांची जबाबदारी आपल्याला मिळेल असा हमजा याचा कयास होता. पण पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांच्या निवडीमुळे तूर्तास पिता-पुत्राचे स्वप्न भंगले आहे. हाबाज संसदेवर निवडून जाईपर्यंत फक्त 45 दिवसांसाठी शाहीद अब्बासी पाकिस्तानचे पंतप्रधान असतील असे सांगण्यात येत होते.