लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी हे तालिबानच्या भीतीने देश सोडून पळून गेले. मात्र, त्यांचा भाऊ हशमत गनी यांनी तालिबानसोबत हातमिळवणी केली आहे. माजी राष्ट्रपतींचा भाऊ तालिबान्यांच्या गोटात सामील झाल्यामुळे हशमत हे चांगलेच चर्चेत आले आहेत.
हशमत गनी यांनी आतापर्यंत स्वत: समोर येऊन तालिबानला पाठिंबा दिलेला नाही. मात्र, त्यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात, की तालिबान देशाला सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहे. कार्यक्षम सरकार चालवण्यासाठी सुशिक्षित अफगाणी तरुणांना सहभागी करून घेणे गरजेचे आहे. तसेच कालबाह्य राजकारण्यांना पूर्णपणे बाजूला करायला हवे, जेणेकरून आधीप्रमाणे सरकार कोसळण्याची भीती राहणार नाही. हशमत गनी यांनी तालिबान नेता खलील-उर-रहमान आणि मौलवी मुफ्ती मोहम्मद झाकीर यांच्या उपस्थितीत हश्मत गनी यांनी तालिबानला पाठिंबा दिल्याचे सूत्र सांगतात.
प्रभावी व्यक्तिमत्त्वअफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळ वझिरिस्तानच्या बाहेर असलेल्या सर्वांत मोठ्या पश्तून जमातींपैकी अहमदाझईंचे प्रतिनिधित्व हशमत गनी करतात. हशमत हे एक शक्तिशाली आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. तसेच ते अफगाणिस्तानच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागातील कुची किंवा खेड्यातील भटक्यांच्या भव्य परिषदेचे प्रमुख आहेत. अहमदाझई ही याच गटाशी संबंधित एक जमात आहे. त्यांचा मोठा प्रभाव असल्याने या काळात ते अफगाणिस्तानात स्थैर्य आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.
गनी समूहाचे मालकn हशमत गनी हे अफगाणिस्तानातील अतिशय श्रीमंत व्यापारी आहेत. त्यांनी ‘गनी ग्रुप इन अफगाणिस्तान’ या नावाने उद्याेगाची स्थापना केली आहे. याची स्थापना 1927 मध्ये ‘अहमदझई ट्रान्सपोर्ट कंपनी’ या नावाने करण्यात आली होती. सध्या हशमत यांचा मुलगा सुलतान गनी हा या समूहाचा अध्यक्ष आहे. कंपनीचे मुख्यालय काबूलमध्ये असून बांधकाम, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, खनिकर्म, सुरक्षा इत्यादी क्षेत्रांशी संबंधित व्यापार करतात.n अफगाणिस्तानसह अमेरिका, पाकिस्तान आणि यूएईमध्ये हशमत गनी यांची संपत्ती आहे. अशरफ गनी यांनी सध्या यूएईमध्ये आश्रय घेतला आहे. हशमत यांनी फ्रान्स आणि अमेरिकेतून शिक्षण पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि विपणन या क्षेत्रात त्यांनी एमबीए केले आहे.