इस्लामाबाद - तोशाखान प्रकरणात इम्रान खान यांना दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबाद येथील एका ट्रायल कोर्टाने तोशाखान प्रकरणात दोषी ठरवत इम्रान खान यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ट्रायल कोर्टाने दिलेल्या ३ वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे आता इम्रान खान यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये, माझी अटक अपेक्षित होती, असे त्यांनी म्हटलं आहे.
तोशाखाना प्रकरणात दिलासा देण्याची इम्रान खान यांची याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान यांनी तोशाखानात ठेवलेल्या भेटवस्तूंचा तपशील जाणूनबुजून लपवल्याचा आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर इस्लामाबाद ट्रायल कोर्टाने निकाल दिला. त्यानंतर, इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गाडीच्या ताफ्यातून त्यांना नेण्यात आल्याचे व्हिडिओतून दिसून येते.
कायद्याची खिल्ली उडवली जात आहे
कोर्टाच्या निर्णयानंतर इम्रान खानचा पक्ष पीटीआयने एक निवेदन जारी केले. हे अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. सरकारला इम्रान खान यांना अपात्र ठरवून तुरुंगात टाकायचे आहे. कायद्याची खिल्ली उडवली जात आहे. तोशाखाना प्रकरणात कोर्टाचा निर्णय अत्यंत पक्षपाती आहे. नैतिकदृष्ट्या भ्रष्ट न्यायाधीशाच्या हातून न्यायाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घणाघाती टीका पीटीआयकडून करण्यात आली आहे. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, तोशाखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे, जेथे इतर सरकारांचे प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरशहा आणि अधिकारी यांना परदेशी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. पंतप्रधान असताना इम्रान खान यांच्यावर तोशाखानात ठेवलेल्या भेटवस्तू कमी किमतीत खरेदी केल्याचा आणि नंतर नफा मिळवण्यासाठी त्या विकल्याचा आरोप होता. या प्रकरणी आता ट्रायल कोर्टाने इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.