लंडन- भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी प्रयत्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे पद पुढील वर्षी रिक्त होणार आहे. कॅनडाच्या मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मार्क कार्ने जून 2019मध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या सर्वोच्च पदावरुन पायउतार होतील, त्यानंतर रघुराम राजन यांना हे पद मिळू शकते अशी चर्चा केली जात होती. मात्र राजन यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला.
शिकागो विद्यापिठात माझी नोकरी उत्तम सुरु असून मी येथेच आनंदी आहे, असे राजन यांनी लंडनमधील कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितले. मला जे सांगायचं आहे ते मी सांगितलं आहे, मी कोणत्याही दुसऱ्या नोकरीसाठी कोठेही आजिबात जाण्याच्या प्रयत्नात नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी आपला मनोदय व्यक्त केलायइंग्लंडचे अर्थमंत्री फिलिप हॅमंड या वर्षअखेरीपर्यंत नव्या गव्हर्नरचे नाव घोषित करतील. मागच्या महिन्यामध्ये वॉशिंग्टनमध्ये त्यांनी परदेशी व्यक्तीचा या पदासाठी विचार होऊ शकतो असे सांगितले होते. रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्ततज्ज्ञ असून त्यांनी 2007-08 या काळात झालेल्या जागतिक मंदीबाबत पूर्वसूचना दिलेली होती. भारताच्या रिझर्व्ह बँक या मध्यवर्ती बँकेची सूत्रेही त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.