अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पहिल्या पत्नीचं इवाना यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाचं कारण सांगण्यात आलेलं नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार न्यूयॉर्कच्या अपर ईस्ट येथे इवाना यांचं राहत्या घरी निधन झालं. ट्रम्प यांनी गुरूवारी दुपारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भातील वृत्त शेअर केलं होतं. इवाना डोनाल्ड ज्युनिअर, इवांका आणि एरिक ट्रम्प यांच्या आई आहेत. इवाना यांच्या निधनानंतर एरिक ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्यवसायात त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं होतं. एक जागतिक स्तरावरील अॅथलिट, सुंदर महिला आणि काळजी घेणारी आई त्यांचं आज निधन झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ट्रम्प यांनी शेअर केलं वृत्तडोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातील वृत्त शेअर केलं आहे. इवाना ट्रम्प यांचं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं, हे वृत्त सांगताना मला अतिशय दु:ख होत आहे, असं ते म्हणाले. इवाना यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर पुन्हा लग्न केलं होतं. १९९५ मध्ये त्यांनी इटालियन व्यावसायिक रिकार्डो माजचेली यांच्याशी विवाह केला. परंतु त्यांचा तो विवाह फार काळ टिकला नाही. ते २ वर्षांतच विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी २००८ मध्ये इटालियन मॉडेल आणि अभिनेता रोसानो रुबिकोंडी यांच्याशी विवाह केला.