अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. किसिंजर एसोसिएट्स इंकने त्यांच्या मृत्यूसंदर्भातील माहिती दिली. नोबेल शांतता पुरस्काराचे वादग्रस्त विजेता आणि कूटनीति जगतातील व्यक्तीमत्त्व अशी ओळख किसिंजर यांची होती. किंसिंजर यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणात निभावलेली भूमिका अमेरिकेचं जागतिक पटलावरील स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची ठरली. कनेक्टिकटमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
किसिंजर यांनी १९७० च्या दशकात रिपब्लिकन राष्ट्रपति रिचर्ड निक्सन यांच्यासोबत विदेश सचिव म्हणून कामकाज पाहिलं. याच दशकातील अनेक युग-परिवर्तनकारी जागतिक घटनांमध्ये त्यांचं थेट योगदान आहे. त्यांनी व्हाईट हाऊसमधील अनेक बैठकांमध्ये सहभाग नोंदवला. तर, लीडरशीप स्टाईलवर आधारित एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे. दरम्यान, २०२३ मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटण्यासाठी ते अचानक बिजिंगला पोहोचले होते. त्यांच्या या दौऱ्याचीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली.
हेन्री किसिंजर हे जर्मनीत जन्मलेले यहूदी शरणार्थी होते. त्यांच्या प्रयत्नातूनच चीन आणि अमेरिका यांच्यातील कूटनिती संबंधाला सुरुवात झाली. ऐतिहासिक अमेरिकी-सोवियत हथियार नियंत्रण वार्ता घडली, इस्रायल आणि त्यांचे शेजारी अरब देशातील संबंधांत वाढ झाली. उत्तरी व्हिएतनामसह पॅरिस शांती करारही झाला.
वादग्रस्त ठरला शांततेचा नोबेल
हेन्री किसिंजर यांना व्हिएतनाम युद्धादरम्यान निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं आहे. १९७३ साली झालेल्या व्हिएतनाम युद्धबंदीसाठी त्यांनी उत्तर व्हिएतनामशी यशस्वीरीत्या चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांना व उत्तर व्हिएतनामचे ली ड्यूक थो यांना संयुक्तपणे हा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. एकीकडे किसिंजर यांनी मोठ्या सन्मानाने या पुरस्काराचा स्वीकार केला असताना दुसरीकडे ली ड्यूक थो यांनी मात्र हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. किसिंजर यांच्या निवडीमुळे झालेल्या वादातूनच तत्कालीन नोबेल पुरस्कार निवड समितीतील दोन सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा त्याग केला होता.