व्हिक्टोरिया : सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हिंदी महासागरात आपली स्थिती बळकट करण्याच्या उद्देशाने भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात बुधवारी सेशेल्सशी चार करार केले. यामध्ये सेशेल्सला त्यांचे जलस्रोत निश्चित करण्यासाठीच्या सहकार्य कराराचाही समावेश आहे.मोदींनी सेशेल्ससोबत सुरक्षेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य मजबूत करण्यासाठी सागरी क्षेत्र निगराणी रडार प्रकल्पाचे उद्घाटनही केले. सेशेल्सला दुसरे ड्रोनिअर विमान देण्याची घोषणाही त्यांनी केली, तसेच त्यांच्या नागरिकांना तीन महिन्यांसाठी मोफत व्हिसा उपलब्ध करून दिला जाईल.मोदी यांची सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष जेम्स एलेक्स मायकल यांच्याशी एकट्यात व शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली. चर्चेनंतर मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी हिंदी महासागरातील व्यापक सहकार्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या ३४ वर्षांत सेशेल्सला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. दरम्यान, पंतप्रधानांसोबत या दौऱ्यात परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचाही भारतीय शिष्टमंडळात समावेश आहे. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासारख्या सागरी देशांसाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. चीन पायाभूत सुविधांद्वारे या देशांत आपली पोहोच वाढवत आहे. या घडामोडी भारताची चिंता वाढविणाऱ्या आहेत. तीन देशांच्या आपल्या दौऱ्यादरम्यान पहिल्या टप्प्यात मोदी मंगळवारी येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मायकल यांच्याशी ‘खूप सार्थक’ चर्चा झाल्याचे सांगत सेशेल्सचा हिंदी महासागरातील शेजारी देशांत महत्त्वाचा सहकारी म्हणून उल्लेख केला. सेशेल्स लवकरच भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्यातील सागरी सुरक्षा सहकार्याच्या क्षेत्रातील पूर्र्ण भागीदार होईल, असा विश्वासही मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, अनुदान आणि कर्जाच्या रूपात भारताद्वारे सेशल्सला ७.५० कोटी डॉलरची रक्कम दिली जाणार आहे. या रकमेचा प्राथमिक गरजांसाठी वापरा करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. मोदींनी मायकल यांना लवकरच भारत दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले. भारताकडे एक प्रमुख देश म्हणून आपण पाहतो आणि लवकरच भारत दौऱ्यावर जाण्याची इच्छा मायकल यांनी व्यक्त केली. सेशेल्सची लोकसंख्या ९० हजार एवढी असून यात १० टक्के भारतीय वंशाचे नागरिक आहेत. (वृत्तसंस्था)
सुरक्षा सहकार्यासाठी भारताचे सेशेल्ससोबत चार करार
By admin | Published: March 11, 2015 11:37 PM