नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. 48 मिनिटांत चार जोरदार भूकंपांनीनेपाळला पुन्हा एकदा विनाशाच्या मार्गावर नेलं. रस्त्यावर भेगा पडल्या आणि अनेक घरे जमीनदोस्त झाली. भूकंप झाला त्यावेळी बहुतांश लोक झोपले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेला भूकंप लोकांना आता पुन्हा एकदा आठवला.
शुक्रवारी रात्री नेपाळमध्ये चार भूकंप झाले. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल वैद्यकीय पथकासह जजरकोट भागात जात आहेत. पंतप्रधानांचे प्रेस सल्लागार गोविंद आचार्य म्हणाले की, औषधे आणि हेलिकॉप्टरसह आरोग्य पथक तयार करण्यात आले आहे, परंतु खराब हवामानामुळे त्या भागात पोहोचण्यास थोडा उशीर झाला आहे. नेपाळमधील या भूकंपाचा केंद्रबिंदू जजरकोटचं रमीडांडा हे होतं. त्यामुळे या भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे.
2015 मध्ये 8 हजार लोकांचा झालेला मृत्यू
याआधी 2015 मध्ये नेपाळमध्ये भीषण भूकंप झाला होता आणि 8000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नेपाळमध्ये 7.8 आणि 8.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नेपाळमध्ये 25 एप्रिल 2015 रोजी सकाळी 11:56 वाजता भूकंप झाला.या भूकंपाचा केंद्रबिंदू लामजुंग हे नेपाळपासून 38 किलोमीटर अंतरावर होते. अनेक महत्त्वाची प्राचीन ऐतिहासिक मंदिरे आणि इतर इमारतीही भूकंपात उद्ध्वस्त झाल्या. 1934 नंतर पहिल्यांदाच नेपाळमध्ये इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला ज्यात 8000 लोकांचा मृत्यू झाला.
"भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा, शक्य ती सर्व मदत करण्यास तयार"
नेपाळमधील या आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीमुळे आपण अत्यंत दु:खी आहोत. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि आम्ही जखमींना लवकरात लवकर बरे व्हावं यासाठी प्रार्थना करतो" असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.