Firing in America: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. आज अमेरिकेच्या ओक्लाहोमाच्या तुलसा शहरात एका रुग्णालय परिसरात गोळीबार झाला आहे. या अंदाधुंद गोळीबारात ४ सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे.
सीएनएनच्या माहितीनुसार तुलसा पोलिसांना बुधवारी सेंट फ्रान्सिस रुग्णालय परिसरात असलेल्या बनी नताली मेडिकल बिल्डिंगमध्ये एका चिकित्सक कार्यालयात एक व्यक्ती बंदुक घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं अॅक्शन मोडमध्ये आले. पण तोवर हल्लेखोर गोळ्या झाडून मोकळा झाला होता. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पण गोळीबार केल्याननंतर त्यानं स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
हल्ल्याचं कारण अस्पष्टतुलसा पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्याकडे एक लांब बंदूक आणि हँडगन देखील होती. मात्र, त्याच्या हल्ल्यामागचा हेतू काय होता, हे समजू शकलेलं नाही. हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर या व्यक्तीनं गोळीबाराची घटना घडवली.
व्हाइट हाऊसला देण्यात आली माहितीदुसरीकडे व्हाईट हाऊसही या घटनेवर लक्ष ठेवून आहे. तुलसा येथील गोळीबाराची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांना देण्यात आली असल्याचं व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. सततच्या गोळीबाराबद्दल बायडन चिंतेत आहेत. ज्यो बायडन यांनी नुकतंच न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्याकडे युनायटेड स्टेट्समधील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी सल्ला मागितला होता.
अमेरिकेत सातत्यानं गोळीबाराच्या घटनाअमेरिकेत वाढत्या हँडगन कल्चरमुळे गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. याआधी न्यू ऑर्लीन्समधील हायस्कूल पदवीप्रदान समारंभात झालेल्या गोळीबारानंतर एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले होते. याआधी गेल्या आठवड्यात उवाल्डे टेक्सासमधील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात १९ निष्पाप मुलांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या स्वतंत्र डेटा संकलन संस्थेच्या अहवालानुसार, २०२२ मध्ये आतापर्यंत अमेरिकेत २१२ सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. २०२१ मध्ये अमेरिकेत ६९३ गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. २०२२ मध्ये ६११ ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना अधिक घडत आहेत. गेल्या ५ वर्षांत शाळांमध्ये गोळीबाराच्या १०० हून अधिक घटना घडल्या आहेत.