ऑनलाइन लोकमत
जर्काता, दि. १४ - इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये सुरु असलेली चकमक संपली असून, सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत चारही दहशतवादी ठार झाले आहेत. या हल्ल्यात सात जण ठार झाले आहेत. अजूनही काही सशस्त्र दहशतवादी फरार असल्याची भिती असून, जकार्तामध्ये पोलिसांची शोध मोहिम सुरु आहे.
गुरुवारी सकाळी जकार्ता बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या आवाजाने हादरले. राष्ट्राध्यक्षांच निवासस्थान, संयुक्त राष्ट्र कार्यालय आणि मॉलजवळ काही बॉम्बस्फोट झाले. घटनास्थळी लगेचच सशस्त्र पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांची हल्लेखोरांबरोबर चकमक सुरु झाली.
तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्टारबक्स कॅफेमध्ये स्फोट घडवून स्वत:ला उडवून घेतले. दोघांनी जवळ असलेल्या पोलिस चौकीवर हल्ला केला.
जकार्तामध्ये एकूण सहा बॉम्बस्फोट झाल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रारंभी वृत्त दिले होते. कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
आत्मघातकी हल्लेखोर संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर होता इथे सुरक्षापथक आणि हल्लेखोरांमध्ये चकमक सुरु आहे अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे अधिकारी जर्मी डग्लस यांनी टि्वटरवरुन दिली होती.
२००९ नंतर जकार्तामध्ये झालेला हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी २००२ मध्ये बालीमध्ये एका नाईटक्लबमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार झाले होते. यात बहुतांश परदेशी नागरीक होते.
यापूर्वीही दहशतवादी संघटनांनी इंडोनेशियामध्ये हल्ले केले आहेत. नववर्षाच्या प्रसंगी दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन चर्च, पर्यटनस्थळे आणि विमानतळावर सुरक्षेसाठी दीडलाख सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आले होते.