नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि परदेशात फरार असलेला नीरव मोदी याच्याभोवती भारतीय तपास यंत्रणांनी फास आवळला आहे. स्वित्झर्लंड येथे नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदीशी संबंधित चार बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये 283.16 कोटी रुपये जमा होते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात स्वीस बँकेकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. ज्यात लिहिलं आहे की, भारताच्या तपास यंत्रणाकडून होणाऱ्या मागणीनंतर नीरव मोदी यांच्याशी संबंधित चार बँक खाती गोठविण्यात आली आहेत. या प्रकरणात सलग दुसऱ्यांदा भारतीय तपास यंत्रणांना यश मिळालं आहे. याआधी बुधवारी या घोटाळ्यातील दुसरा आरोप मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पण करण्याचा अडथळा दूर झाला आहे. अँटिग्वाचे पंतप्रधान यांनी मेहुल चोक्सीची नागरिकता रद्द करण्याचं जाहीर केले तसेच चोकसीचं नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असं देखील पंतप्रधानांनी सांगितलं त्यामुळे चोक्सीकडे कोणताच कायदेशीर मार्ग राहिला नाही.
गेल्या मार्चमध्ये अटक झाल्यापासून नीरव मोदी ईशान्य लंडनमधील वॅण्ड्सवर्थ तुरुंगात आहे. प्रत्यार्पणासंबंधी सुनावणी घेणाऱ्या वेस्ट मिनस्टर न्यायालयातील मॅजिस्ट्रेट मेरी एलिझाबेथ मेलॉन यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजे २७ जूनपर्यंत मोदी यास कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मोदी याने जामिनासाठी पाच लाख पौंड जमा करण्याची तयारी दर्शवून तीन वेळा जामिनासाठी अर्ज केला. मात्र मॅजिस्ट्रेट मेलॉन यांनी ते फेटाळले होते.
कोणत्या तुरुंगात?दरम्यान, प्रत्यार्पण प्रकरण ऐकणाऱ्या न्यायालयाने मोदीला भारतात परत पाठविले, तर कोणत्या तुरुंगात ठेवणार याचा तपशील १४ दिवसांत देण्यास सांगितले आहे. त्यानुसार भारत सरकारने महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेऊन दुसºया बँक घोटाळ्यातील आरोपी विजय मल्ल्या याच्यासाठी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील जी कोठडी निवडली आहे तेथेच मोदीलाही ठेवता येईल, असे ठरविले असून तसे न्यायालयास कळविले जाईल.